महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ सप्टेंबर । गेल्या चार दशकांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ साजरा केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. पण अलीकडेच शिवसेना पक्षात फूट पडल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर आपणच दसरा मेळावा घेणार आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून केला आहे. तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्याबाबत चाचपणी करत असल्याची माहिती समजत आहे.
दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं आयोजन करावं. त्यांनीच राज्यातील हिंदू जनतेला मार्गदर्शन करावं, अशी विनंती महाराष्ट्र सैनिकांकडून करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. यावर राज ठाकरे काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांचे मनोगत pic.twitter.com/4zUv4uuTwL
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 2, 2022
संबंधित पत्रातून ठाकरे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ठाकरे गटाचा उल्लेख ‘यू-टर्न गट’ आणि शिंदे गटाचा उल्लेख ‘बंडखोर गट’ असा करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालालाच तिलांजली दिली, त्यांनी बेगड्या धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांशी आघाडी करून लाखो शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केल्याची टीकाही पत्रातून केली आहे.