महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ सप्टेंबर । आशिया चषक मोहिमेदरम्यान भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला आगामी आशिया चषक सामन्यांना मुकावं लागणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जाडेजा पुढील सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्याजागी डावखुऱ्या अक्षर पटेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जाडेजानं 35 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर त्यानं हार्दिकसोबत केलेल्या भागीदारीमुळे भारतानं हा सामना 5 विकेट्सनी जिंकला होता.
बीसीसीआयनं अधिकृतरित्या याची घोषणा केली आहे. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर जाडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सध्या बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. आशिया चषकावेळी भारतीय संघाची निवड करताना अक्षर पटेल, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर या तिघांना स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. तो लवकरच भारतीय संघात दाखल होईल.
NEWS – Axar Patel replaces injured Ravindra Jadeja in Asia Cup squad.
More details here – https://t.co/NvcBjeXOv4 #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 2, 2022
आशिया चषकाआधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे जायबंदी झाला होता. त्याच्यासह हर्षल पटेललाही वेस्ट इंडिज दौऱ्यात दुखापत झाल्यानं टीम इंडिया या दोघांशिवाय आशिया चषकासाठी दुबईत दाखल झाली. पण आता स्पर्धेदरम्यान रवींद्र जाडेजासारख्या महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यानं टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला आहे.