महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । राज्यातील शाळांमध्ये (School) तब्बल ५५ ते ६० हजार शिक्षकांची पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम करत असल्याचा आरोप भाजप (BJP) समर्थीत आमदार नागो गाणार यांनी केला आहे.
गेल्या १०-१२ वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सरकारी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेत ३१ हजार ५७२ शिक्षकांची पदं रिक्त असून अनुदानीत खाजगी शाळांमध्ये २५ हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत.
शिक्षक नसतील तर मग सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? असा प्रश्न भाजप समर्थीत आमदार नागो गाणार यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी आणि सध्याच्या सरकारचंही शिक्षणाच्या बाबतीत धोरणं सारखचं आहे, असं म्हणत गाणार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
तिजोरीतील पैसा वाचवण्यासाठी आणि कायम विना अनुदानित शाळांना फायदा पोहचविण्यासाठी शिक्षकांची पदं रिक्त ठेवली जात, असल्याचा आरोपही गाणार यांनी केलाय. हे सरकार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळखंडोबा करतंय, मात्र आम्ही शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत राहणार असल्याचं गाणार यांनी सांगितलं.