आधी मुख्यमंत्री, आता राहुल शेवाळे ; मिलिंद नार्वेकरांच्या भेटीगाठी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत वेगाने सत्ता समीकरणं बदलताना दिसत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे भाजप-शिंदे-मनसे अशी महायुती स्थापन होण्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी भेट झाली. हा प्रकार ताजा असतानाच शिंदे गटाचे लोकसभा प्रतोद आणि मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचीही मिलिंद नार्वेकरांशी भेट झाली. त्यामुळे नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने राहुल शेवाळे आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली. ही भेट योगायोगाने झाली की ठरवून, हे स्पष्ट झालेलं नाही. गणपती मंडळात भाविकांच्या गर्दीत झालेल्या या भेटीत दोघांमध्ये काय गप्पा झाल्या, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेना आमदार अजय चौधरीही यावेळी उपस्थित होते. तिघांमध्ये हास्यविनोद होतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मिलिंद नार्वेकरांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने झालेली भेट ताजी असतानाच, शिंदे गटातील खासदाराशीही नार्वेकरांची गुफ्तगू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे संकटमोचक अशी ज्यांची ख्याती आहे, त्या मिलिंद नार्वेकर यांनाच शिंदे आपल्या गटात ओढून घेतायत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शिंदे-नार्वेकर दोघांमध्ये काही काळ चर्चा रंगली. ही चर्चा नेमकी कशावर होती, हे स्पष्ट झालेलं नाही. भेट गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने असली, तरी दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा होणं स्वाभाविक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *