महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । देशात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. यानंतरच्या दुर्गापूजा या मोठ्या उत्सवाची तयारीही जोरात सुरू आहे. युनेस्कोने दुर्गापूजेला ‘सांस्कृतिक वारसा’ असा दर्जा दिल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये उत्साही वातावरण आहे.
जागतिक पातळीवर मिळालेल्या या बहुमानामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्साहात आहेत. याची झलक त्यांनी गुरुवारी कोलकात्यात काढलेल्या ऐतिहासिक मिरवणुकीत दिसली.
युनेस्कोचे आभार मानण्यासाठी काढण्यात आलेल्या पाच किलोमीटरच्या मिरवणुकीत सर्व क्लबचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक नाचत-गात सहभागी झाले होते. दुर्गापूजेला यंदा बंगालमध्ये ३७,००० पेक्षा अधिक कार्यक्रम होतील. यापैकी २५०० कोलकात्यात होतील.
२६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवादरम्यान बंगालमध्ये १ ते ५ ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रम होतील. यंदा दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची आणखीही दोन कारणे आहेत. पहिले, दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच कोरोनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे लोक निश्चिंतपणे पूजा करू शकतील. दुसरे, मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालमध्ये ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत दुर्गापूजेच्या सुट्या जाहीर केल्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये २२ दिवस सुट्या मिळतील. गेल्या वर्षी १६ सुट्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ४३ हजार क्लबना पूजेसाठीचा मदतनिधी १० हजार रुपयांवरून ६० हजार रुपये केला आहे. विजेच्या बिलातही ६० टक्के सवलत मिळेल.
दुर्गापूजा ही बंगालच्या अर्थव्यवस्थेसाठी कुबेराप्रमाणे आहे. पर्यटन विभागाने मान्यता दिलेल्या ब्रिटिश कौन्सिलच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, महामारीच्या आधी दुर्गापूजेशी संबंधित उद्योगांचा व्यवसाय वार्षिक ३२,३७७ कोटी रुपयांचा होता. हे बंगालच्या जीडीपीच्या २.५८% आहे. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये रिटेल क्षेत्राचा वाटा जवळपास २७,३६४ कोटी रुपयांचा आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेला बोनस मिळतो. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.