![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात रविवारी मृत्यू झाला. यानंतर सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोळे यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात आणण्यात आलं. या दोघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांचंही शवविच्छेदन करण्यात आलं.
शवविच्छेदन अहवालानुसार या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. ज्याला वैद्यकीय भाषेत पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालावरून मर्सिडीज कारच्या भीषण अपघाताचा अंदाज लावता येईल की, गाडीचा वेग किती जास्त असू शकतो.
जेजे रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोळे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कासा पोलीस स्टेशनला (अपघात झाला त्याठिकाणचं स्थानिक पोलिस स्टेशन) पाठवला आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक परदेशात राहतात, ते आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचतील. त्यामुळे सायरस यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
पोलिसांनी या अपघाताप्रकरणी मोठे खुलासे केले आहेत. या गाडीमधील दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता, असं एका पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले की, गाडी अतिशय वेगात होती, त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा. या गाडीने अपघात झाला त्यावेळी अवघ्या 9 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर अंतर पार केलं होतं. यावरुन गाडीच्या स्पीडचा अंदाज लावता येतो.