महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सभा घेण्यास परवानगी न मिळाल्यास शिवेसना कोर्टात जाणार असल्याची माहिती शिवेसना नेत्या मनिषा कायंदे यांनी दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आहे. गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. बाळासाहेब यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आले आहेत. यंदाही शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेकडून महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे.
मेळावा नेमका कोण घेणार
मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे, असेही शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटाकडून स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. तशिंदे गटाचे आमदार मेळाव्याच्या तयारीला लागल्याची माहिती आहे.
यामुळे एकनाथ शिंदे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करणार, असे बोलले जात आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे गटाच्या राज्यभरातील आमदार आणि कार्यकर्त्यांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, आता मुंबई पालिकेकडून दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनाच परवानगी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा शिवाजी पार्कवर हा मेळावा नेमका कोण घेणार, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.