आजपासून तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । तुकडा तांदळाबाबत (BROKEN RICE) केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आजपासून तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी आज, 9 सप्टेंबर 2022 पासून लागू झाली आहे, असे अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले आहे. देशातील अनेक भागात कमी पावसामुळे यंदा तांदूळ उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ही परिस्थिती पाहता भारतातील अन्नसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गहू आणि साखरेनंतर तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे.

कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारतातील तांदळाखालील एकूण क्षेत्र या हंगामात आतापर्यंत 12 टक्क्क्यांनी कमी झाले आहे. दरम्यान, जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. भारताने या वर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीववर बंदी घातली होती. कारण अनेक राज्यांमध्ये विक्रमी उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले होते. तसेच, अन्न पुरवठ्याचे संरक्षण करण्यासाठी भारताने साखर निर्यातीवरही बंदी घातली होती.

कृषी मंत्रालयाने म्हटले होते की, 12 ऑगस्टपर्यंत भाताचे क्षेत्र 30.98 मिलियन हेक्टर (76.55 दशलक्ष एकर) पर्यंत घसरले आहे, जे एका वर्षापूर्वी 35.36 मिलियन हेक्टर होते. मात्र, उसासाठी वाटप केलेले क्षेत्र 5.45 मिलियम वरून 5.52 मिलियन हेक्‍टर इतके वाढले आहे. दरम्यान, भारतातून तांदळाच्या एकूण निर्यातीत तुकडा तांदळाचा वाटा जवळपास 20 टक्के आहे आणि जगाच्या एकूण तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे.

देशातील तांदूळ उत्पादक राज्य कोणती?
भात भारतातील प्रमुख अन्न आहे. ज्या राज्यांमध्ये तांदूळ जास्त खाल्ला जातो, तिथे त्याचं पिकही जास्त घेतले जाते. पंजाब आणि हरियाणा याला अपवाद आहेत. या राज्यांतील मुख्य अन्न चपाती (Roti) आहे, परंतु अधिक पैसे कमावण्यासाठी तेथील शेतकरी भातशेती करतात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, आसाम आणि हरियाणा ही भारतातील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *