महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । इंडोनेशियाची अनेक बेटं आहेत, त्यापैकी एका बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ (लास्ट पॅराडाईज ऑन अर्थ) असे म्हटले जाते. या बेटाचे नाव ‘राजा अम्पत’ असे आहे. हे बेट त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी तर ओळखले जातेच, शिवाय तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठीही ते विख्यात आहे.
मॅक्स एम्मर नावाच्या डच माणसाने या बेटाचा शोध लावला. दुसर्या महायुद्धात सैन्यात सहभागी झालेल्या त्याच्या घर मालकाकडून मॅक्सला याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने इंडोनेशिया गाठले व या बेटाचा शोध सुरू केला. त्यासाठी मॅक्स सुमारे चार महिने या बेटावरून त्या बेटावर जात राहिला. यावेळी अनेक मच्छीमारांची त्याने मदत घेतली.
अखेरीस इंडोनेशियाचा भाग असलेल्या पश्चिम पापुआ प्रांताजवळ त्याला हे ‘राजा अम्पत’ बेट सापडले. याठिकाणी असलेली थक्क करणारी सागरी जैवविविधता आणि तुलनेने दुर्गम स्थानामुळे लोक राजा अम्पत बेटाला ‘पृथ्वीवरील शेवटचा स्वर्ग’ म्हणू लागले.या बेटाजवळ माशांच्या 1600 प्रजाती आढळतात. जगात आढळणार्या प्रवाळ प्रजातींपैकी 75 टक्के प्रजातीही याठिकाणी आढळतात. एक काळ असा होता की या बेटाचे अस्तित्व धोक्यात आले होते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक कामे होत होती व अनियंत्रित, बेसुमार मासेमारीही होत होती. त्यानंतर 2004 मध्ये राजा अम्पतला पश्चिम पापुआच्या बर्डस् हेड सीस्केप उपक्रमात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर त्याचा सागरी संरक्षित क्षेत्रात समावेश करण्यात आला.