महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट; दृश्य पाहून मुख्यमंत्री भरपावसात गाडीतून उतरले अन्…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । धावत्या दुचाकीने किंवा कारने पेट घेतल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. या घटनांचे व्हिडिओ थरकाप उडवणारे असतात. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवून वेळीच गाडीपासून दूर गेल्यास यात मोठी दुर्घटना टाळणं शक्य होतं. अशीच काहीशी घटना विलेपार्ले इथे पाहायला मिळाली. इथे एका गाडीने अचानक पेट घेतला. मात्र, या घटनेची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना ज्याठिकाणी घडली, त्याच रस्त्याने मुख्यमंत्री प्रवास करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी निघाले होते. यावेळी त्यांना एका तरुणाच्या गाडीने पेट घेतल्याचं दिसलं.

महामार्गावरील हे दृश्य पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली गाडी थांबवली आणि भरपावसात ते खाली उतरले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तरुणाला त्याचं नाव आणि पत्ता विचारला. पुढे तरुणाला धीर देत मुख्यमंत्री म्हणाले, की जीव वाचला हे महत्त्वाचं आहे, गाडी आपण दुसरी घेऊ. काळजी करू नकोस, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. गाडीमध्ये बसण्यासाठी जाण्याआधी मुख्यमंत्र्यांनी या तरुणाला पुन्हा बर्निंग बाईकच्या जास्त जवळ न जाण्याचा सल्ला दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मागील बाजूला एक दुचाकीने पेट घेतल्याचंही दिसतं. हा जाळ पाहूनच अंदाज लावता येऊ शकतो, की या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *