महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । इंग्लंड संघातील (England Team) आघाडीचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठं यश मिळवलं आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ओव्हल टेस्टमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात 3 विकेट्स पटकावले. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 566 विकेट्स झाल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या ओव्हल कसोटीत त्याने एकूण 7 गडी बाद करत हा मोठा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये आता फक्त जेम्स अँडरसन (James Anderson) हा एकटाच त्याच्या पुढे आहे. स्टुवर्टने या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकले आहे. ग्लेनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 563 विकेट मिळवले आहेत.
टॉप 5 कोण?
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात ब्रॉड पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. त्याने 159 टेस्ट सामन्यात 27.77 च्या सरासरीने 566 विकेट्स नावावर केले आहेत. दरम्यान टेस्ट क्रिकेटमध्ये टॉप-5 गोलंदाजांचा विचार करता त्याच्या पुढे अनिल कुंबळे (619 विकेट्स), जेम्स एंडरसन (665 विकेट्स), शेन वॉर्न (708 विकेट्स) आणि मुथय्या मुरलीधरन (800 विकेट्स) हे विराजमान आहेत. टेस्ट क्रिकेटमधील या टॉप-5 गोलंदाजांमध्ये तीन फिरकीपटू तर दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.