CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणतात, “आत्तापर्यंतचा…”

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांचा १० सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्याने न्या. लळित यांचा सत्कार मुंबई उच्च न्यायालयाने केला. न्या. लळित महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्यांची वकिली कारकीर्द सुरू झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हा सत्कार केला. या सत्कारासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद, गोवा इत्यादी पीठांतील न्यायाधीशांसही सपत्नीक निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयातून सत्कार आयोजकांनी या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींस निमंत्रण दिले आणि त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. याच वादावर आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

उज्वल निकम यांनी या प्रकरणावरुन केली जाणारी टीका आणि एकंदरीत प्रकरणासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे. टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार उज्वल निकम यांनी या प्रकरणावरुन उगाच गैरअर्थ काढू नये असं म्हटलं आहे. “ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले होते. आत्तापर्यंतचा प्रघात आहे की भारतातील सर्व न्यायाधीशांचा ज्यावेळी सत्कार होत असतो त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नेते उपस्थित राहतात. उगाच त्यामधून अर्थ आणि गैरअर्थ काढणं योग्य नाही,” असं निकम यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *