सप्तशृंग गड नवरात्रोत्सवापासून भाविकांसाठी खुला; पहिल्या माळेला होणार आदिमायेचे दर्शन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । आदिशक्ती, आदिमाया, सप्तशृंग निवासिनी तसेच लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरूपाला डोळ्यात साठवण्यासाठी आसुसलेल्या भाविकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून (दि.२६) मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा कळवणचे प्रांत विकास मिना यांनी दिली.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरू असलेले देवीच्या मूर्तीवरील शेंदूर लेपन कवच काढण्याचे काम पूर्ण झाले असून, मूळ स्वरूपातील देवीच्या दर्शनाची आस सर्वच भक्तांना लागली आहे. नवरात्रोत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गड वाहतुकीसाठी सुस्थितीत असलेल्या व शक्यतो नव्या बसेसचाच वापर करावा, पायवाटेवर आरोग्य सुविधा, ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट उभारणे तसेच भाविकांसाठी यात्रा सुरू होण्याआधी हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करणे, आदी महत्त्वाच्या सूचनाही मिना यांनी नवरात्रोत्सवाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत दिल्या.

सप्तशृंग गडावर देवस्थान ट्रस्ट, रोपवे प्रशासन, ग्रामपंचायत व सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला पोलिस उपअधीक्षक अमोल गायकवाड, निरीक्षक समाधान नागरे, तहसीलदार बंडू कापसे, बीडीओ पाटील, देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अॅड. ललित निकम यांच्यासह सर्वच खात्याचे प्रमुख उपस्थित होते. मात्र आजच्या बैठकीत केवळ एक विश्वस्त उपस्थित होते. प्रांतांनी बैठकीनंतर गडावर प्रत्यक्ष पाहणी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात बोकडबळी बंदी कायम आहे. मात्र प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणेच ग्रामस्थांनी तो देण्याचे ठरवले आहे.

 

बैठकीतील महत्त्वाच्या सूचना

यात्रोत्सवात प्लॅस्टिक बंदीचे नियमांचे पालन व्हावे

भाविकांना ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी पुरवावे

घाट रस्त्यावरील खड्डे बांधकाम विभागाने त्वरित बुजवावे

दोन अतिरिक्त रुग्णवाहिका यात्रा काळात गडावर उपलब्ध करून द्याव्यात

ठिकठिकाणी आवश्यक मेडिकल चेकअप कॅम्प सुरू करावेत

अतिक्रमणधारकांना इशारा

गडावरील स्वच्छतेबाबत तसेच मंदिर परिसरातील अग्निशमन उपकरणावरून विशेष काळजी घेण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापनाला सांगण्यात आले. गड ग्रामपंचायत हद्दीत यात्रोत्सवात होणारे अतिक्रमण काढून टाकावेत अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *