बारामतीच्या MIDC तील लॉजवर घृणास्पद कृत्य ; पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । बारामतीतील एमआयडीसीतील RTO कार्यालयाजवळील हाॅटेल राजलक्ष्मी येथील लाॅजिंगवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत येथे वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला.

किरण बापू पाटील , युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार गणेश शिवदास काटकर यांनी फिर्याद दिली. उपविभागी पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह त्यांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला. 10 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

येथील राजलक्ष्मी हाॅटेल, परमीट रुम, बार व लाॅजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती इंगळे यांना मिळाली होती. त्यानुसार पंच व बनावट ग्राहकांना सोबत घेत पथक या भागात पोहोचले. बनावट ग्राहकाकडे काही नोटा देत त्याचे क्रमांक नमुद करून घेण्यात आले. त्याने लाॅजिंगवर जात वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली. १२०० रुपये दर त्याला सांगण्यात आला. त्यानुसार त्याने पैसे देत पथकाला इशारा केला.

पथकाने येथे छापा टाकला असता व्यवस्थापक किरण पाटील याला ताब्यात घेतले. एका खोलीतून दोन महिलांची सुटका केली. त्यातील एक महिला ओडिसा तर दुसरी आसाम राज्यातील आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल जप्त केले. पाटील यांच्याकडील चौकशीत युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण यांच्या सांगण्यावरून हा व्यवसाय येथे केला जात असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाटील याला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *