Monkeypox Symptoms : मंकीपॉक्समुळे मेंदूवर परिणाम होतो ? संशोधनातून आली धक्कादायक माहिती समोर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । भारतात कोरोनाचा (Coronavirus) शिरकाव होऊन अडीच वर्ष पूर्ण होत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी कोरोनाबद्दलची भीती आजही लोकांच्या मनात कायम आहे. कोरोना वाढत असताना त्याची लक्षणं सातत्यानं बदलत गेली. अगदी त्याचप्रमाणे जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या मंकीपॉक्स (Monkeypox) या आजाराचंही होतंय. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ई-क्लिनिकल मेडिसीन जर्नलमध्ये (E-Clinical Medicine Journal) मंकीपॉक्सच्या नवीन लक्षणांबाबत सांगितलं गेलंय. मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांच्या मेंदूत सूज आणि डोकेदुखी ही नवीन लक्षणं आता समोर आली आहेत. ‘झी न्यूज हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

यापूर्वी मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांच्या शरीरावर पुरळ येणं आणि फ्लू (Flu) अशी लक्षणं होती. पण आता इतरही काही लक्षणं समोर आल्यानं चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सचा प्रसार आणि लक्षणांबद्दल सातत्यानं संशोधनही केलं जातंय.

काही वर्षांआधी कांजिण्याचा (Smallpox) मेंदूवर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी यावर संशोधन केल गेलं. यात कांजिण्यांचं लसीकरण झालेल्या लोकांमधील व्हायरसचा प्रभाव कसा होतो हे पाहिलं गेलं. यात मज्जासंस्थेशी संबंधित गुंतागुंत (Neurological Complications) वाढल्याचं समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी मंकीपॉक्सचा मेंदूवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मंकीपॉक्स झालेले 2 ते 3 टक्के लोक गंभीररित्या आजारी होतात आणि त्यांना मेंदूचा झटका (Seizure Disorders) आणि मेंदूला सूज (Encephalitis) येते. इन्सेफेलायटिस या आजारात व्यक्तीला आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ शकतं.

संशोधनादरम्यान मंकीपॉक्सवर झालेल्या इतर संशोधनाचा डेटा तपासण्यात आला. शास्त्रज्ञांच्या मते, मंकीपॉक्स झालेले काही रुग्ण गोंधळलेल्या अवस्थेत असतात. या आजाराचा सामना करणाऱ्या व्यक्तींना डोकेदुखी, स्नायुदुखी, थकवा अशी मज्जासंस्थेशी संबंधित (Neurological) लक्षणंही दिसून आली आहेत. ही लक्षणं नेमकी किती दिवस राहतात यावर संशोधनात स्पष्ट कालावधी दिलेला नाही. दरम्यान, नैराश्य आणि चिंता (Anxiety & Depression) किती टक्के रुग्णांमध्ये येऊ शकते यावर सखोल संशोधनाची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

संशोधनात सहभागी झालेल्या वैज्ञानिकांनुसार, मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांत न्यूरॉलॉजिकल आणि सायकिअ‍ॅट्रिक लक्षणं दिसून आली. परंतु, याला मंकीपॉक्सचा व्हायरस कारणीभूत आहे की नाही याबद्दल खात्रीशीर सांगता येत नाही. यासाठी आणखी संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. संशोधन केल्यानंतरच यात इतर काही लक्षणं समोर येतात का हे पाहता येणार असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *