कॅमेरे पाहून काल पवारांची भेट टाळली; आशिष शेलार आज पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या खासगी निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. खरंतर कालच ही भेट होणार होती. या भेटीसाठी शेलार हे काल या परिसरातही आले होते. मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहून आशिष शेलारांनी पवार यांची भेट घेण्याचं टाळलं होतं.

एमसीए अध्यक्षपदासाठी २८ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. एमसीए निवडणुकीवर गेल्या काही दशकांपासून शरद पवार यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीआधी विविध पक्षाच्या नेत्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही समावेश होता.

या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एकमेकांना मदत करत असल्याचं याआधीही दिसून आलं होतं. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यातील मधुर राजकीय संबंध सर्वश्रूत आहे. या पार्श्वभूमीवर आज होत असलेली पवार-शेलार भेट महत्त्वाची मानली जात आहे.

एमसीए अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. १९८३ च्या विश्वचषक विजयात सिंहाचा वाटा उचलणारे संदीप पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संदीप पाटील हे शरद पवारांचे समर्थक आहेत. संदीप पाटील यांच्यासोबतच विजय पाटील, अमोल काळे, मिलिंद नार्वेकर आणि नवीन शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *