महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, वेदांता यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, या यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले.
नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या होत्या. परंतु नेमकं दोन वर्षांमध्ये त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करून तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे शिंदे यांनी दिले.
तत्कालीन सरकारकडून गेल्या दोन वर्षांत वेदांता फॉक्सकॉन कंपनीला जसा प्रतिसाद मिळायला हवा होता, तसा तो मिळाला नसेल त्यामुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शंका शिंदे यांनी व्यक्त केली.
इतकंच नव्हे तर हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न केल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत. या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगावजवळील ११०० एकर जमीनही देण्यात आली होती. 30-35 हजार कोटींच्या सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या.नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.