महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड- विशेष प्रतिनिधी- लक्ष्मण रोकडे- पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील रिक्षा चालकांना मनपाने सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी ५००० रुपये द्यावेत अशी मागणी पिंपरी विधान सभेचे आमदार अण्णा बनसोडे ह्यांनी महापालिकेला केली.
ऑटोरिक्षा हे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे वाहन असून रिक्षाचा रंग, हद्द, प्रवासी संख्या, प्रवास दर (मीटर) , चालक / मालक गणवेश याच बरोबर इंधन प्रकार अशा बाबी शासन ठरवून देते. म्हणूनच शहराच्या पर्यावरण रक्षणासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पूर्वी LPG व आता CNG इंधनाची सक्ती रिक्षा वाहनास बंधनकारक केलेली आहे.
शहरातील अंर्तगत प्रवासी वाहतुकीच्या उपाय योजनेसाठी रिक्षासह सर्व वाहतूक गेले सव्वा महिन्याहून अधिक काळ बंद आहे. रोजची कमाई थांबल्यामुळे व मुळात आर्थिक स्थितीमुळे अडचणीची असल्याने रिक्षा चालकांची परिस्थिती अधिकच अडचणीची झाली आहे. त्यांच्यासमोर जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला असून अशा वेळी शहरातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या या घटकाला मदतीचा हात महापालिकेने देणे अपेक्षित आहे.
या पूर्वी पुणे व पिंपरी – चिंचवड या दोन्ही महापालिकांनी पालकसंस्था म्हणून रिक्षा चालकाला CNG किट साठी प्रत्येकी रुपये १२०००/- अनुदान दिले होते. त्या अनुषंगाने सध्याच्या ‘COVID -19’ अर्थात कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भविलेल्या परिस्थीतीत प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे हे रिक्षाचालकांचे उत्पन्न बंद झाले आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी – चिंचवड हद्दीतील सामान्य रिक्षाचालकांना सहाय्यता अनुदान मिळणे अपेक्षित आहे असे मत आमदार बनसोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील रिक्षाचालकांना रु. ५०००/- सहायत्ता अनुदान म्हणून वितरीत करणेबाबत आवश्यक योग्य कार्यवाही करावी अशी लेखी सूचना दोन्ही मनपा आयुक्तांना आमदार बनसोडे यांनी केली आहे.
अण्णा बनसोडे
आमदार, पिंपरी विधानसभा