शिंदे गटाला धक्का ?; पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून ‘एकला चलो रे’चा नारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ सप्टेंबर । पालिका निवडणुकीसाठी मनसेकडून ‘एकला चलो रे ‘चा नारा देण्यात आला आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेच्या या नाऱ्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने युतीच्या चर्चेला उधाण आले होते. मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिंदे गट युती करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सर्व पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे. मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागांवर मनसेचे उमेदवार उभा करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभा करणार असल्याची माहितीदेखील संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

युती हा जर तरचा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमधे चैतन्य कायम ठेवण्यासाठी पालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. यासोबतच, राज ठाकरेंच्या आदेशानुसार तयारीला सुरुवातदेखील केली असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

तसेच, मनसेचा विदर्भ दौरा सुरू होत आहे. पक्ष वाढीसाठी हा दौरा करण्यात येणरा असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यासोबतच, दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो ह्याला फार महत्त्व नाही. असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *