महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सेनेने त्याची जोरदार तयारी चालवली आहे. मात्र ठाकरे यांच्या यात्रेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू गर्व गर्जना यात्रेचे नियोजन केले आहे. हिंदू गर्व गर्जना यात्रेच्या माध्यमातून सेनेच्या बंडखोर गटाने ठाकरे गटावर पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने संभाव्य पडझड सावरण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईत निष्ठा तर राज्यात शिवसंवाद यात्रा काढून शिंदे गटावर हल्लाबोल चालवला आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आदित्य यांच्या झंझावाती दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर राज्याचा दौरा करणार आहेत.
उद्धव यांच्या ५ ऑक्टोबरनंतर होणाऱ्या दौऱ्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच टेंभी नाक्यावरून होणार आहे, तर सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांची “महाप्रबोधन यात्रा’ जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा सुरू होणार आहे. २० ते ३० सप्टेंबरदरम्यान मुख्यमंत्र्यांची संपर्क यात्रा सुरू होणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी (१३ सप्टेंबर) मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला खासदार, मंत्री, आमदार आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची संपर्क यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी मंत्री, उपनेते आमदार आणि जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. १० दिवसांच्या संपर्क यात्रेदरम्यान मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्ह्यांत जनतेशी संपर्क साधणार आहेत. या संपर्क यात्रेत होणाऱ्या सभांमधून मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करतील. तसेच बंड केल्यापाठीमागची भूमिका मांडणार असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी आढावा घेण्यासाठी संबंधित मंत्री, उपनेते, संबंधित जिल्ह्याचे प्रमुख हे जिल्ह्यात दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या संपर्क यात्रेनिमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.