महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस वारंवार समोर येत आहे. दिल्ली येथील पक्षाच्या अधिवेशनात बोलू दिले नाही म्हणून अजितदादा पवार नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तो संदर्भ देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘दादा, भाजपमध्ये या’ अशी ऑफर दिली. त्यावर अजित पवारांनी मला भाजपमध्ये प्रवेशाच्या निमंत्रणाची फालतूगिरी थांबवा, असे प्रत्युत्तर दिले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना प्रमोशन मिळाले नाही म्हणून त्या नाराज असल्याचे वृत्त येताच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादी प्रवेशाचे निमंत्रण दिले होते. त्याची परतफेड बावनकुळे यांनी सोमवारी धुळे येथे केली. ते म्हणाले, पंकजा यांना राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे मध्य प्रदेशची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत.
पण नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादीचे कोणी भाजपमध्ये येण्यास तयार असेल तर त्याचे स्वागतच आहे. त्यावर औरंगाबादेत आलेल्या अजितदादांना विचारणा केली असता ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनीही मागे जयंत पाटील यांना असेच विचारले होते. मला बावनकुळेंना असे सांगायचे आहे की, त्यांनी त्यांच्या पक्षाचे पाहावे. महागाई, बेरोजगारीमुळे भाजपची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बावनकुळे असे बोलत असावेत. या पलीकडे त्यात काहीही तथ्य नाही.
बारामतीही बदलू शकते
बारामतीतील राष्ट्रवादीचे घड्याळ बंद करू, असे मी राजकीय अर्थाने बोललो. ते पवार कुटुंबीयांनी वैयक्तिक घेतले. अमेठी बदलू शकते तर बारामतीही बदलू शकते, असे मला म्हणायचे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.