Vedanta & Foxconn: वेदांता प्रकल्पावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. दरम्यान हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं दुर्दैवी आहे. हा प्रकल्प आता परत महाराष्ट्रात येऊ शकत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

“वेदांता प्रकल्पाच्या बदल्यात दुसरा मोठा प्रकल्प देण्याचं आमिष दाखवलं जात असून याला काही अर्थ नाही. हे तर लहान मुलांना समजूत काढल्यासारखं आहे. पण तळेगाव हीच या प्रकल्पासाठी योग्य जागा होती. वेदांताकडून असे अनेक प्रकल्प गुजरातला हलवले आहेत. त्यामुळे आता यावर चर्चा करून काही फायदा नाही” असं शरद पवार म्हणाले आहेत.

हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात येत आहे. पण सामंत, शिंदे हे आमच्या सरकाच्या वेळेस मंत्री होते, त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करणे योग्य नाही असाही टोला त्यांनी लावला आहे. त्याचबरोबर, “नरेंद्र मादी यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी मदत केली तर त्यांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करू. पण सध्याच्या स्थितीवरून असं दिसतंय की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणं शक्य नाही. त्याच्या बदल्यात मोदींनी मोठा प्रकल्प देण्याचं आमिष हे रडणाऱ्या पोराला फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं आहे.” असा टोला पवारांनी लावला आहे.

दरम्यान, मोदी शाहा यांचं सरकार केंद्रात सत्तेत असल्यामुळे त्या सत्तेचा फायदा गुजरात सारख्या राज्यांना होतो. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे गुजरातमध्येच सर्वांत जास्त दौरे झाले आहेत. त्यामुळे आता या विषयावर चर्चा करण्याला काही अर्थ नाही. यानंतर जास्तीत जास्त प्रकल्प राज्यात कसे येतील यावर सरकारने लक्ष द्यावं असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *