महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ सप्टेंबर । एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत अनेक बदल केले जात आहेत. राजकीय समीकरणांसोबत शिवसेना पक्षातील अंतर्गत अनेक गोष्टींमध्येही बदल केले आहे. या सर्वांमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ असणारी व्यक्ती म्हणून मिलिंद नार्वेकरांची ओळख असून, बंडखोरीनंतर नार्वेकरांवर मध्यस्थी करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता नार्वेकरांच्या जागी एका कट्टर शिवसैनिकावर मोठी जबाबदारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमुळे नार्वेकरांची गच्छंती होणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
त्यात नुकताच 21 सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती रवी म्हात्रे अनेकदा पाहण्यास मिळाले होते. त्यामुळे ठाकरेंचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या नार्वेकरांची जागा आता रवी म्हात्रे घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, या बदलाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बंडकरून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील अनेक जणांनी ठाकरें भोवती एक चौकडी जमली असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. तसेच राणे, राज ठाकरे आदींनी देखील शिवसेना सोडतांना असेच आरोप केले होते. टीका होणाऱ्यांमध्ये मिलिंद नार्वेकरांचे नाव नेहमीच आघाडीवर होते. यामुळेच ठाकरेंनी नार्वेकरांऐवजी म्हात्रे यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले जात आहे.
मधल्या काळात म्हात्रे पक्षात सक्रीय नव्हते मात्र, बंडखोरीनंतर म्हात्रे पुन्हा एकदा सक्रीय झाले असून, नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्यात म्हात्रे अनेकदा ठाकरेंच्या अवती भोवती फिरत असल्याचे दिसून आले. 1994 पासून मिलिंद नार्वेवर शिवसेनेशी जोडलेले असून, 2018 मध्ये त्यांची शिवसेनेचे सचिव म्हणून घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता म्हात्रेंची उद्धव ठाकरेंशी वाढलेली जवळीक पाहता नार्वेकरांची जागा रवी म्हात्रे घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.