महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ सप्टेंबर । सरकारने सीएनजीच्या दरात भरमसाट वाढ केल्याने आता रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडय़ात वाढ होणार आहे. केंद्र सरकारमुळे सर्वसामान्यांचा प्रवासही महागणार आहे. टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपयांवरून 28 रुपये आणि रिक्षाचे भाडे 21 रुपयांवरून 23 रुपये होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून ही भाडेवाढ लागू होणार असून या निर्णयावर येत्या सोमवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची आज मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बैठक झाली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन या बैठकीला उपस्थित होते.
मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाढलेल्या सीएनजी दरामुळे टॅक्सी भाडेदरात दहा तर रिक्षा भाडेदरात पाच रुपये वाढ करून मागितली होती. यासाठी टॅक्सीमेन्स युनियनने संपाची हाक दिली होती; परंतु भाडेदर निश्चित झाल्याने संप मागे घेत असल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस क्वॉड्रोस यांनी दिली.
या बैठकीत रिक्षा स्टॅण्ड, पार्पिंगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षाचालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याचे टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये, भाडे वाढल्यानंतर 28 रुपये
सध्याचे ऑटो रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये, भाडे वाढल्यानंतर 23 रुपये