सीबीआयचे ऑपरेशन ‘मेघचक्र’: ऑनलाइन चाइल्ड पोर्न प्रकरणी 19 राज्यांत छापे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ सप्टेंबर । देशभरात चाइल्ड पोर्नोग्राफीचा कंटेंट ऑनलाइन देणारे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी सीबीआयने १९ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात छापे टाकले. ५० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन मेघचक्र’ नाव देण्यात आले. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी दुपारपर्यंत ही कारवाई चालली. काही राज्यांत बाल लैंगिक शोषणाच्या व्हिडिओ क्लिप तयार करून त्या डार्क वेबच्या क्लाऊडमध्ये अपलोड केल्या जात असल्याची माहिती सीबीआयला इंटरपोलकडून मिळाली होती.

‘ऑपरेशन मेघचक्र’ची पटकथा न्यूझीलंडमधून मिळालेल्या इंटरपोलच्या इनपुटच्या आधारे तयार केली होती. सीबीआयच्या सायबर गुन्हे शाखेने इंटरपोलच्या मदतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई केली. सूत्रांनुसार एक महिन्यापूर्वी न्यूझीलंडमध्ये स्थानिक पोलिसांना एका बाल लैंगिक शोषण रॅकेटची माहिती मिळाली. त्याची पाळेमुळे भारतात होती. तेथे चाइल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्यांकडून जे अश्लील व्हिडिओ मिळाले ते भारतात बनवले गेले होते आणि भारतातूनच डार्क वेबमध्ये क्लाऊडवर अपलोड केले होते.

न्यूझीलंड पोलिसांनी ही माहिती इंटरपोलला आणि इंटरपोलने ती सिंगापूरमधील मुख्यालयाच्या क्राइम अगेन्स्ट चाइल्ड युनिटला दिली. तेथून ती भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडे आली. गृह मंत्रालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. सीबीआयच्या सायबर गुन्हे शाखेने सतत १५ दिवस डार्क वेबवर क्लाऊडचे विश्लेषण केले. हे व्हिडिओ भारतातील १९ राज्यांत तयार करून क्लाऊडवर टाकले जात आहेत आणि अनेक लोक ते डाउनलोड करत असल्याचे आढळले. सीबीआयने सर्व ५९ स्थळांवर छापे टाकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *