महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ सप्टेंबर । आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या जल्लोषात आजपासून सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या देवी सप्तश्रृंगीचा नवरात्र उत्सवही गडावर सुरू झाला आहे. मूर्ती संवर्धनानंतर आजपासून मंदिर भाविकांसाठी खुले झाले आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने आज देवीच्या गाभाऱ्यात अतिशय आकर्षक अशी पुष्प सजावट देवीच्या भक्तांनी केली आहे.
देवीचे मूळ मनोहर रूप बघण्यासाठी सर्वच भाविक भक्त आतुर झाले होते. नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सप्तशृंगी मातेेची विधिवत पूजा करून पहाटे पासूनच भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुल करण्यात आले. शेकडो भाविक गडावर दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पहिल्या माळेच्या मुहूर्तावर देवीच दर्शन व्हावं ही सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
देवीच्या मूळ मूर्तीवरील शेंदूर कवच काढण्यात आल्याने भगवतीचे तेजोमय रूप समोर आले आहे. या स्वरूपाची पुन्हा झीज होऊ नये म्हणून 25 किलो चांदीची उत्सव मूर्ती बनवण्यात आली आहे. नवरात्रोत्सवामुळे ही मूर्ती फक्त चार दिवसात बनवण्यात आली असून याच मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला जाणार आहे. मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण असून परिसरात अनेक प्रकारची दुकाने सज्ज झाली आहेत. दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर यंदा भाविकांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. समुद्रसपाटीपासून गडाची 4569 फूट उंची आहे. या गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत. गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. अतिशय रमणीय हा परिसर आहे. दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात.