महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ सप्टेंबर । रुपया विक्रमी नवीन नीचांकी पातळीवर आला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपया ५६ पैशांनी घसरला आहे. आता रुपया ८१.५५ प्रति डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.५५ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने कच्च्या तेलाची आणि इतर वस्तूंची आयात महाग होईल. ज्यामुळे महागाई आणखी वाढेल.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वारंवार वाढ केल्यामुळे भारतीय रुपयावरील दबाव वाढतो आहे. यामुळे व्यापार तूट आणि परदेशी भांडवला काढण्याचा प्रमाणआणखी वाढण्याची अपेक्षा आहे. RBI ची पत धोरण समिती (MPC) या आठवड्याच्या शेवटी द्वि-मासिक पत धोरण जाहीर करणार आहे. यामध्ये महागाईचा दबाव कमी करण्यासाठी रेपो दरात ०.५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मिल मालकांची संघटना असलेल्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता यांनी माहिती दिली आहे. रुपयाच्या घसरणीने आयात केलेल्या खाद्यतेलाची किंमत वाढेल. त्याचा बोजा शेवटी ग्राहकांवरच पडणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये वनस्पती तेलाची आयात गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ४१.५५ टक्क्यांनी वाढून १.८९ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ झाल्यामुळे ऑगस्टमध्ये भारताची व्यापार तूट दुप्पट होऊन २७.९८ अब्ज डॉलर इतकी झाली. या वर्षी ऑगस्टमध्ये पेट्रोलियम, कच्चे तेल आणि उत्पादनांची आयात वार्षिक ८७.४४ टक्क्यांनी वाढून १७.७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. वस्तूंच्या किमती घसरल्याने चलनवाढीवर अनुकूल परिणाम रुपयाच्या घसरणीमुळे काही प्रमाणात होईल.
कोणतीही मध्यवर्ती बँक आपल्या चलनाचे अवमूल्यन सध्यातरी थांबवू शकत नाही आणि आरबीआयही मर्यादित कालावधीसाठी रुपयाती घसरण होऊ देईल. चलन खालच्या स्तरावर स्थिर होते, तेव्हा रुपयाचे मूल्य नाटकीयरित्या वाढते आणि भारताचा बळकट पाया लक्षात घेता ही एक शक्यता आहे, असे एसबीआयच्या अहवालात म्हलटे आहे. रुपयाच्या मूल्यात झालेली ही घसरण देशांतर्गत आर्थिक मूलभूत गोष्टींमुळे नव्हे, तर डॉलरच्या मजबूतीमुळे झाली आहे, असे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.