महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची?, धनुष्यबाण कुणाला मिळणार?, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, अशा विविध मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक असणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार असून याकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. (mumbai shiv sena news today)
विशेष बाब म्हणजे आजची सुनावणी ही महाराष्ट्रातील जनतेला लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे बघायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना हा संघर्ष अगदी शेवटच्या टप्प्यात आला असून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या अखेरच्या सुनावणीतच त्याबाबातचे भाष्य केले असून केंद्रीय निवडणूक आयोगाला या प्रकरणाला कोणतीही कारवाई करण्यास पुढील सुनावणीपर्यंत मज्जाव केला होता, त्यावर सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालय मार्ग काढण्याची शक्यता आहे.
आमदारांच्या पात्र अपात्रतेपासून राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायलयाकडे जवळपास दहा एकमेकांशी संबंधित असणाऱ्या याचिका प्रलंबित आहेत. ७ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांमार्फत निवडणूक चिन्हाच्या मुद्यावर भर दिला होता. (shiv sena news supreme court today)
या मुद्यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. हाच मुद्या निवडणूक आयोगाच्या वकिलांनीसुद्धा उपस्थित केला होता. या मुद्यावर घटनापीठ काय निर्णय घेणार, हे सुनावणीच्या वेळी स्पष्ट होणार आहे.
कोणकोणत्या याचिकांवर होणार सुनावणी?
– विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या कारवाईविरोधात बंडखोर आमदारांनी केलेली याचिका.
– महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या दिलेल्या निर्देशांना आव्हान दिले होते, ती याचिका.
– अध्यक्ष निवडीवेळी प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेल्या व्हिपबाबतची याचिका
– बहुमत चाचणी घेण्याच्या निर्णयाला दिलेले आव्हान.
– विधिमंडळ नेतेपदाची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान
– भरत गोगावले यांच्या प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान
– प्रतोदनिवडीच्या शिवसेनेच्या पत्राची दखल न घेतल्याबद्दलची याचिका
– निवडणूक आयोगाला सुनावणी करण्यास मनाई करण्यासाठीची शिवसेनेची याचिका
– धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याची मागणी करणारी याचिका