महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । ऐन सणासुदीत पालेभाज्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे कोथिंबीरीची जुडी १०० रुपयांच्या घरात गेली आहे. तर पालक, मेथीसारख्या भाज्या जवळपास उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. यंदा पावसाळा चांगलाच लांबला. मागील आठवड्यापर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पण त्याचा फटका भाज्यांना बसला. अतिरिक्त पावसामुळे अनेक ठिकाणी भाज्यांचे नुकसान झाले. यामुळे प्रामुख्याने पालेभाज्या यामुळे प्रचंड महागल्या.
‘अतिरिक्त पावसाने पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी भाज्या वाहून गेल्या. तर काही ठिकाणी उभ्या शेतातील माल खराब झाला. काही ठिकाणी वेळेत कापणी केलेली भाजी भिजल्याने जागेवरच सडून गेली’, अशी माहिती संबंधितांनी दिली.
कोथिंबीरीचे पीक प्रामुख्याने पावसाळ्यात सर्वाधिक घेतले जाते. रोजच्या वापरात विशेषत: सणासुदीला मोठ्या प्रमाणावर त्याची आवश्यकता असते. मात्र आवक घटल्याने आणि मागणी वाढल्यामुळे मागील महिन्यापर्यंत घाऊक बाजारात साधारण ४० रुपये दरम्यान असलेली कोथिंबीर जुडी आता १०० रुपयांवर गेली आहे. घाऊक बाजारातच इतका दर वाढल्याने मुंबईच्या अनेक भागांत कोथिंबीर आणि अन्य भाज्या दिसत नाहीत. दिवाळीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.