सातारा जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ५२;कराड तालुक्यातील तब्बल ८ जणांना कोरोनाची लागण

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – सातारा – विशेष प्रतिनिधी – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कोरोना विषाणूने आपला पाशवी विळखा आणखी घट्ट केला आहे. कराड तालुक्यातील तब्बल ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता.१) सकाळी स्पष्ट झाले. तर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात काम करत असलेल्या सातारा तालुक्यातील आणखी एका महिलेस कोरोना झाला असून सातारा जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या ५२ इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजवर कराड तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे लोन आता कराड शहरात आले आहे.

कराडमधील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात पाच महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून एका पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यापैकीच एक महिला सातारा येथून उपजिल्हा रुग्णालयात नोकरीसाठी येते, अशी माहिती समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश कर्मचारी कराडातच वास्तव्यास आहेत. त्याचबरोबर उंब्रज येथील एका महिलेस कोरोनाची लागण झाली असून कराड शहरातील रुक्मिणीनगर परिसरात प्रसूती झालेल्या एका महिलेची कोरोना झाला आहे.

चार दिवसापूर्वी मलकापूर येथील एका प्रसूती झालेल्या महिलेस कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या महिलेलाही कोरोना झाल्याने चिंता वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कराडमधील रुक्मिणीनगर परिसरातील महिलेची प्रसुती एका खाजगी दवाखान्यात झाली आहे. त्यामुळे संबंधित महिलेस कोरोनाची बाधा कशी झाली ? हा गुंता सोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. तसेच सातारा येथून कराडला अपडाऊन करणारी महिला कोणा कोणाच्या संपर्कात आली ? हे शोधण्याचे काम हे प्रशासनाकडून सुरू आहे.

आजवर तालुक्यातील ग्रामीण भागात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने कराड शहरात प्रवेश केल्याने संपूर्ण कराडसह जिल्हा हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *