Cabinet Meeting : शिवभोजन थाळी सुरूच राहणार ; देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ सप्टेंबर । शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेच्या पुढाकारानं मविआ सरकारनं सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरू राहिल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी भुजबळांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय मंत्रीमंडळात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरील निर्णय घेण्यात आले आहेत.

 

मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे रखडलेल्या प्रलंबित उमेदवारांना आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.राज्यभरात 1064 उमेदवार रखडले होते त्यांना आज विविध पदावर नियुक्तीपत्र देण्यात आले. या पदामध्ये तलाठी, नायब तहसीलदार, महावितरण अशा विविध पदाच्या भरत्या रखडल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा निर्णय मार्गी लावण्यात आला आहे.

राज्यात फोर्टीफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार. (अन्न व नागरी पुरवठा विभाग)

राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार. (नियोजन विभाग)

नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना. (नगर विकास विभाग)

पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण वीस हजार पदे भरणार (गृह विभाग)

इतर मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणार. (वन विभाग)

राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयातील पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू. (वैद्यकीय शिक्षण विभाग)

दुय्यम न्यायालयातील न्यायीक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायीक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णय (विधि व न्याय विभाग)

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम सुधारणाचे विधेयक मागे घेणार. दुरुस्तीसह पुन्हा लागू करणार (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनीअरींग सर्व्हीसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीच्या मुल्यावरील मुद्रांक शुल्क माफ. (महसूल विभाग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळास बॅ.नाथ पै विमानतळ असे नाव देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *