थापा पाठोपाठ बाळासाहेबांच्या जवळची आणखी एक व्यक्ती मातोश्रीबाहेर, 35 वर्ष होते साहेबांसोबत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ सप्टेंबर । बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या दोन व्यक्तींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चंपासिंग थापा आणि मोरेश्वर राजे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंची साथ सोडली. चंपासिंग थापा आणि मोरेश्वर राजे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा अंत्ययात्रेवेळी चंपासिंग थापाला बाळासाहेबांच्या पार्थिवाशेजारी स्थान देण्यात आलं होतं.

मोरेश्वर राजे कोण आहेत?

मोरेश्वर राजे हे बराच काळ बाळासाहेब ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहत होते. 35 वर्ष मोरेश्वर राजे यांनी मातोश्रीचे फोन कॉल उचलण्याचं काम केलं. मुंबईवर फडकलेला शिवसेनेचे भगवा ते महाराष्ट्रभर फोफावलेली शिवसेना, तसंच छगन भुजबळ यांचं बंड, बाळासाहेब ठाकरेंचा हा राजकीय प्रवास आणि त्यातले चढ उतार या सगळ्याचे साक्षीदार मोरेश्वर राजे होते.

चंपासिंग थापा सावली

चंपासिंग थापा 30 वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून त्यांनी पोटापाण्यासाठी छोटी-मोठी कामं करायला सुरूवात केली. भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला आणि काही काळातच थापा बाळासाहेबांचा लाडका झाला. बाळासाहेब ठाकरे यांचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर थापा लक्ष ठेवून असायचा. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब आणखीनच हळवे झाले होते, तेव्हा थापाने बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीशेजारीच थापाचीही छोटीशी खोली होती. थापाचं कुटुंब नेपाळमध्ये तर दोन मुलं दुबईमध्ये असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *