पुण्यात सारसबागेजवळ साकारणार वॉकिंग प्लाझा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । पुण्यातील सारसबागेत प्रवेश करण्यासाठी या परिसरातील विक्रेत्यांनी अस्ताव्यस्त मांडलेल्या टेबल-खुर्च्या, त्यापुढे विविध खेळणी आणि इतर विक्रेत्यांचे अतिक्रमण अशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यामुळे येथील चौपाटीची पुनर्रचना करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. सारसबाग चौपाटी येथे ‘वॉकिंग प्लाझा’ प्रस्तावित असून, त्याचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे. त्यामुळे सध्या अतिक्रमणांनी वेढलेला हा परिसर अधिक आकर्षक होणार आहे.

या परिसरातील विक्रेत्यांना अटी-शर्तींनुसार खुर्च्या व छतासाठी जागा निश्चित करून दिली जाईल. त्यामुळे उर्वरित जागेत नागरिकांना निर्धास्तपणे चालणे शक्य होणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली. सारसबागेबाहेरील रस्त्यावर दुतर्फा खाद्यपदार्थांचे स्टॉल; तसेच मुलांसाठी लहान-मोठ्या खेळण्यांचेही स्टॉल आहेत. महापालिकेने या परिसरात ५३ जणांना व्यवसाय परवाने दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांनी स्टॉलला हॉटेलचे स्वरूप दिले असून, अनेकांचे कामगारही तेथेच राहतात. त्यामुळे नियमभंग होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १४ मे रोजी येथील ५३ स्टॉल सील केले होते. परवानगी दिलेल्या जागेतच व्यवसाय करू, अतिक्रमण करणार नाही, कामगार येथे मुक्कामी राहणार नाहीत, असे हमीपत्र दिल्यासच या स्टॉलचे सील काढण्यात येईल, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली होती.

पथारी व्यावसायिक संघटनांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती. यानुसार आता वॉकिंग प्लाझाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याबाबत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून आठवडाभरात बैठक घेऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. वॉकिंग प्लाझा तयार झाल्यानंतर चौपाटी परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पेशवे उद्यानाजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत आपली वाहने नेता येतील. त्यामुळे सारसबागेत येणाऱ्यांना आता या रस्त्यावर निर्धास्तपणे चालणे शक्य होईल.

 

सध्या सारसबागेच्या चौपाटीवर दोन्ही बाजूने दुकाने आहेत. सारसबागेच्या सीमाभिंतीला लागून असलेली सर्व दुकाने समोरच्या बाजूस स्थलांतरित केली जातील. तेथील खेळण्यांसाठीही स्वतंत्र व्यवस्था असेल. मात्र, या संदर्भात येथील व्यावसायिकांशी चर्चा करूनच निर्णय अंतिम केला जाईल.

असा असेल वॉकिंग प्लाझा

– सर्व खर्च पालिका करणार

– स्टॉलधारकांना कोणताही खर्च नाही.

– सर्वांना समान आकाराचे स्टॉल मिळणार.

– खुर्च्यांसाठीही समान आकाराची जागा मिळणार.

वॉकिंग प्लाझा झाल्यानंतर सारसबागेचे रूप पालटेल. पर्यटकांना निर्धास्तपणे चालत फिरता येईल. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल. अधिकृत व्यावसायिकांनाही जागा दिली जाणार असल्याने त्यांनाही अडचण येणार नाही. लवकरच हा आराखडा अंतिम केला जाईल.

– विक्रमकुमार, आयुक्त तथा प्रशासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *