Pune Rain : पुण्यात पावासाचं कमबॅक; गडगडाटासह जोरदार पावासाला सुरूवात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसानं उसंत घेतली होती. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळी अचानक विजांच्या गडगडाटासह शहरातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. अचानक आलेल्या पावसाने अनेक नागरिकांची मात्र, तारंबळ उडाली. तर, शाळा सुटण्यावेळी पावसाने हजेरी लावल्याने शाळकरी विद्यार्थांनी मात्र, भिजत घरी जाण्याचा आनंद लुटला. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, पुणे, नाशिक, अकोला, चंद्रपूर आदी भागात पुढील दोन तास विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी सतर्क संस्थेने वर्तवला आहे.

भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. हवामान विभागानं ही महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार दिल्लीतून मॉन्सूननं माघार घेतली असून हळूहळू तो दक्षिण भारताके सरकत जाऊन येत्या काही दिवसात संपूर्ण भारतात माघार घेईल. दरम्यान, ठिकठिकाणी परतीचा पाऊस बरसण्याची शक्यताही आहे. गेल्या आठवड्याभरापासून परतीचा पाऊस थांबला होता. त्याला गुरुवारी (ता. २९) पुन्हा चालना मिळाली आहे. दरम्यान, मॉन्सूनने गुरुवारी वायव्य भारतातील आणखीन काही भागातून परतल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

पोषक हवामानामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला २० सप्टेंबरला सुरवात झाली होती. त्यावेळी मॉन्सून गुजरात व राजस्थानच्या काही भागातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर मॉन्‍सूनच्या परतीचा प्रवास आठवडाभरापेक्षा अधिक काळासाठी थांबला होता. त्यात यंदा मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *