सप्तशृंग गडावर शेकडो वर्षांची परंपरा असलेली बोकडबळीची प्रथा पुन्हा सुरु होणार ; उच्च न्यायालयाचा निकाल ; पण ‘हे’ नियम बंधनकारक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । सप्तशृंग गडावर शेकडो वर्षांची परंपरा असलेली बोकडबळीची प्रथा गेल्या पाच वर्षांपासून तत्कालीन विश्वस्त मंडळ व जिल्हा प्रशासनाने बंद केली होती. या निर्णयाविरोधात आदिवासी विकास संस्था, धोडंबे (ता. सुरगाणा) यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन ही प्रथा पुन्हा पारंपरिक पद्धतीने सुरू करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याने आदिवासी बांधव, भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी गावातून सवाद्य मिरवणूक काढून गडावरील दीपमाळ परिसरातील दसरा टप्प्यावर बोकडबळी देण्याची पूर्वापार प्रथा आहे. बोकडबळी देताना सप्तशृंगी देवी न्यासाच्या वतीने मानवंदना म्हणून हवेत गोळीबार करण्याची परंपरा होती; मात्र ११ सप्टेंबर २०१६ रोजी दसऱ्याच्या दिवशी परंपरेनुसार बोकडबळी देण्याचा विधी सुरू असताना ट्रस्टच्या सुरक्षारक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटून भिंतीवरील दगडावर आपटल्याने गोळीचे छरे उडून १२ भाविक जखमी झाले होते. या प्रथेमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केली होती. यानंतर सप्टेंबर २०१७पासून गडावरील दसरा टप्पा व ट्रस्टच्या हद्दीत बोकडबळी व हवेत गोळीबार करण्याच्या प्रथेस तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली. या निर्णयाविरोधात आदिवासी विकास संस्था, धोडंबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असून, यात न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने बंदी उठवून प्रथा परंपरेनुसार बोकडबळी देण्यास परवानगी दिली.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान सर्वोत्कृष्ट डील, HP, Lenovo, MSI, Asus आणि इतर बर्‍याच ब्रँड्सकडून सर्वाधिक विक्री होणारे लॅपटॉप मिळवा.

…अशी राहणार नियमावली

– दसरा टप्प्यावर सकाळी निर्धारित वेळेत हा विधी मानकरी मिळून एकूण ५ ते ६ जणांच्या उपस्थितीत होईल.

– गर्दी व सुरक्षिततेच्या दृष्टीने कमी कालावधीत हा विधी होईल.

– बोकडबळी कालावधीत उतरत्या पायरीने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल.

– विधीप्रसंगी बंदुकीची सलामी देण्यात येणार नाही.

– बोकडबळीनंतर रक्ताला पैसे लावण्याचेही टाळले जाईल.

बोकडबळी परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे देवस्थान ट्रस्टकडून स्वागत आहे. या विधीसाठी देवस्थान ट्रस्ट, प्रशासन व सप्तशृंग गड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने एक नियमावली सादर करण्यात आली होती. त्यानुसार हा बोकडबळी विधी होणार आहे.
– अॅड. ललित निकम, विश्वस्त, सप्तशृंगी ट्रस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *