यंदा दसरा मेळाव्याला पोलिसांवर डबल ताण ; मुंबई पोलिसांसमोर २ मेळाव्यांचे दुहेरी आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात सध्या कमालीची अस्थिरता असून यंदा प्रथमच दसऱ्याला दोन मेळावे होत आहेत. शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यांचा ताण पोलिस यंत्रणेवर पडणार आहे. कायदा आणि सुवस्था राखणे आणि वाहतूककोंडी ही दोन मोठी आव्हाने पोलिसांपुढे आहेत. दोन्ही गट आपल्या मेळाव्यात विक्रमी गर्दी होईल, असा दावा करीत असल्याने पोलिसांवरील ताणही ‘विक्रमी’ वाढणार आहे.

शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसऱ्याला शिवाजी पार्कवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यासाठी पक्षाप्रमाणे पोलिसांच्या वतीनेही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत आणखी एक गट तयार झाला असून या गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन्ही मेळावे आयोजित करण्यात आल्यामुळे पोलिसांना दोन्ही ठिकाणी बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. दोन्ही गटांमधून एकमेकांवर सुरू असलेल्या टीका, झटापटीच्या घटना, आयोजनावर न्यायालयात झालेला वाद या पार्श्वभूमीवर या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी चाचपणी सुरू केली आहे. बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याने नियमावलीप्रमाणे त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिकही मेळाव्यासाठी एकत्र येणार असल्याने या ठिकाणीही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

बीकेसी आणि शिवाजी पार्क मैदानात बंदोबस्ताची आखणी करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिक पोलिस, सशस्त्र दलाचे पोलिस, एसआरपीएफ यांची आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार आहे. मुंबई तसेच बाहेरून मेळाव्यासाठी येणारे कार्यकर्ते आणि त्यांची वाहने यामुळे कोंडी होऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणच्या आयोजकांना सूचना देण्यात आल्या आहे. मेळाव्याच्या ठिकाणी येताना दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊ नयेत, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळ्या मार्गावर पोलिस तैनात ठेवण्यात येत आहेत. सध्या सुरू असलेला नवरात्रोत्सव, दसऱ्याच्या दिवशी असणारे इतर सोहळे, देवीच्या विसर्जन मिरवणुका आणि त्यातच दोन मेळावे असल्याने बंदोबस्ताचा ताण वाढणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *