महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ ऑक्टोबर । दसऱ्यानिमित्त मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क तसेच वांद्रे-कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानावर अनुक्रमे उद्धव ठाकरे ठाकरेंच्या गटाचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचा मेळावा पार पडत आहे. सायंकाळी पाच वाजताची वेळ दोन्ही मेळाव्यांसाठी कार्यकर्त्यांना देण्यात आली होती. मात्र या मेळाव्यांमधील प्रमुख आकर्षण असणारी भाषणं ही लांबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषणं उशीरा सुरु होतील अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावरून घेतला आहे. सायंकाळी साडेपाचला नंदेश उमप यांच्या गाण्याने मेळाव्याला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं आहे. यानंतर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे, आमदार शहाजीबापू पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आनंदराव आडसूळ, विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची भाषणं होतील.
या मान्यवरांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री शिंदे भाषण करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. साधारपणे सायंकाळी सात वाजता शिंदे बीकेसी मैदानावर दाखल होतील. यानंतर आठ ते सव्वाआठ या वेळेत ते भाषणासाठी उभे राहतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटातील आमदारांसोबत आलेल्या समर्थकांना संबोधित करतील.
दुसरीकडे दादरमधील शिवाजी पार्कवरही गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला सुरुवात होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे साडेसात वाजता आपल्या ‘मातोश्री’ या निवासस्थानावरुन निघतील. ‘मातोश्री’ ते शिवाजी पार्क हा प्रवास १५ मिनिटांचा आहे. उद्धव हे पावणेआठला सभास्थळी पोहोचतील. साधारण आठ वाजण्याच्या आसपास उद्धव यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे, असं ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
शिवाजी पार्कची क्षमता ही अंदाजे ८० हजार इतकी आहे. तर बीकेसीमधील मैदानाची क्षमता ही शिवाजी पार्कच्या दुप्पट म्हणजेच दीड लाखांहून अधिक आहे. दोन्ही मैदानांमध्ये दुपारी एकपासूनच समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.