महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ ऑक्टोबर । शिवसेनेतील दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत (Mumbai) होणाऱ्या शिवसेना (Shivsena) दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते जात आहेत. त्यातच नाशिक मुंबई महामार्गावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि शिंदे गट (Eknath Shinde) यांच्यात तुफान राडा झाला आहे. मेळावा सुरु होण्यापूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असून शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना गाडीतून इशारे करत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याच वेळी भर रस्त्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गाडी अडवत आक्रमक होत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप दिला आहे. यावेळी मोठा राडा नाशिक – मुंबई महामार्गावर झाल्याचे दिसून आले आहे.
नाशिकमधून आज शिंदे आणि ठाकरे गटाचे समर्थक एकाच वेळेच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.घोटी जवळ दोन्ही गटाच्या वाहनांच्या रांगा जवळजवळ आल्या होत्या. त्यावेळी शिंदे गटाच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या महिलांना इशारे केले होते.दोन्ही गटाकडून समोरासमोर आल्यानंतर घोषणाबाजी करत असतांना हा सर्व प्रकार घडला असून अश्लील हावभाव केल्याचा ठाकरे गटाच्या महिलांचा आरोप आहे. याच दरम्यान घोटी जवळ ठाकरे गटाच्या महिलांनी शिंदे समर्थकांच्या गाडी ला अडवून चोप दिल्याचे समोर आले आहे. जीप मध्ये बसलेल्या शिंदे समर्थकांना बस मध्ये बसलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना घोषणाबाजी करतांना विचित्र हावभाव करत इशारे केले होते.