महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ ऑक्टोबर । अखेर शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून विरोधकांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो’ असं म्हणत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा घेतला होता.या मेळाव्याला मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचून भाषण केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता ट्वीटकरून निशाणा साधला.
भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो,
अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो.
राजसाहेब ते राजसाहेबच !#मजा_नाय_राव #BKC_तर_KBC_होता#खोके#MNS #दसरा_मेळावा #शिवतीर्थ #BKC pic.twitter.com/jfU8U7IQ4W
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 5, 2022
‘भाषणासाठी कोणाला कोणावरचा ‘राग’ लागतो,अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा ‘वाघ’ लागतो.राजसाहेब ते राजसाहेबच’ असं म्हणत राजू पाटील यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.तसंच, बीकेसीमध्ये तर केबीसी होता, मजा नही आया, असा हॅशटॅग वापरून राजू पाटील यांनी टीका केली.
विशेष म्हणजे, शिंदे सरकार आल्यानंतर मनसे आणि भाजपची जवळीक वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या घरी भाजपच्या नेत्यांची ये जा वाढली होती. एवढंच नाहीतर शिंदे सरकारमध्ये मनसेला सुद्धा मंत्रिपद मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण पहिल्या विस्तारानंतर ही चर्चा हवेत विरून गेली. त्यानंतर राजू पाटील यांनी उघडपणे शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यास सुरू केले.