महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । अरुणाचल प्रदेशातील भारत आणि चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना यवतमाळच्या जवानाला वीरमरण आले आहे. 16000 फूट उंचीवर ड्युटीवर असताना लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचा श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
यवतमाळ जिल्ह्यातील वनी इथं राहणारे कर्नल वासुदेव आवारी भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत होते. कर्नल वासुदेव आवारी हे 170 फिल्ड रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली होती. ते अरुणाचल प्रदेशातील भारत चीन बॉर्डरवर समुद्र पातळीवरून 16000 फूट उंचीवर कर्तव्य बजावत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ गुवाहाटीतील 151 मिलिटरी बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी गुरुवारी वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी कामठी मिलिटरी बेस्टतर्फे त्यांना मानवंदना व सलामी दिली जाणार आहे. लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव संध्याकाळी पाच वाजता वनी इथं पोहोचणार आहे.
लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या पार्थिवावर उद्या सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता त्यांच्या मुळगावी मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आवारी यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.