महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ ऑक्टोबर । जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा वाढलेले पुरवठा, इंडोनेशिया, मलेशिया पामतेलाचे आणि देशात तेलबियांचे अधिक उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात घसरण झालेली आहे. १५ किलो डब्ब्याच्या मागे सरासरी ४५० ते ६०० रुपयांची घसरण गेल्या एक महिन्यात झालेली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो ३० ते ४० रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मागच्या काही काळापासून खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याने गृहिणींच्या फोडणीवर मर्यादा आल्या होत्या. दरम्यान दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर आठवड्यात खाद्यतेलाचे दर आणखी उतरले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला लागणारी चाट काही प्रमाणात कमी झाली आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते.
दसरा-दीपावलीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमती उतरू लागल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्षामुळे डिसेंबर-जानेवारीपासून खाद्य तेलाचा भडका उडाला होता. तेलाची आयात थांबल्याने तेलाची दरवाढ होत होती. केंद्र सरकारने तेलावरील सीमा शुल्क रद्द केले. त्यामुळे बाजारात सातत्याने खाद्य तेलाच्या दरात घसरण होत आहे. मागील दोन महिन्यांत खाद्य तेलाचे दर २० ते २५ टक्क्यांनी उतरले आहेत.
बाजारेठेत सध्या मलेशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया येथून तेलाची आयात होत आहे. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची २० ते ३० टक्के प्रमाणात आयात सुरू झाली आहे. पाम तेल महिन्याला आठ ते नऊ लाख टन असे ६० टक्के आयात होत आहे. देशात ६० टक्के तेलाची आयात होत तर देशातून ४० टक्के तेलाचा पुरवठा होतो.