Shivsena: धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल’; शिंदे गटाला विश्वास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० ऑक्टोबर । महाराष्ट्रात जून महिन्यात मोठा राजकीय उलटफेर झाला. शिवसेनेतून ५० आमदारांनी बंड केले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळे झाले. त्यानंतर, आकड्यांच्या बळावर, शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची… ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगात होणार आहे. पण तत्पूर्वी, अंधेरीची पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्पुरते पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून ठेवले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आणि शिंदे गटावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टिकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलंय. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह आमचं आहे, दु:ख आम्हाला झालंय, असेही ते म्हणाले.

आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी करणार आहोत. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. कारण, शेवटी खऱ्याला न्याय मिळत असतो, आमची बाजू खरी आहे, त्यामुळे हा न्याय निश्चितपणे होईल, असे दिपक केसरकर यांनी म्हटले. तसेच, आम्ही ८ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, २३ सप्टेंबर, ७ ऑक्टोबर रोजी आम्ही निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिली आहेत. त्यामुळे, आमच्याकडून द्यायचं काहीच शिल्लक नाही, ज्यांच्याकडे काही नाहीच, ज्यांची बाजूच खोटी होती. तरीही ते आज म्हणतायंत की आम्ही त्यांचं चिन्ह गोठवायला निघालोय, पण चिन्ह आमचं आहे, चिन्ह गोठल्याचं दु:ख आम्हाला झालं पाहिजे, असे म्हणत केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे, ही लोकशाही शाबूत ठेवण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे. मात्र, त्यांच्याबद्दल आज काहीही ट्विट केलं जातंय. भारतातील निवडणुका ह्या निरपेक्ष मानल्या जातात, जगभरात त्याचा आदर केला जातो. आम्ही हरलो की संस्था चुकीची ही मांडली जाणारी भूमिका चुकीची आहे, असेही केसरकर यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नावांचे आणि निवडणूक चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. यापैकी एक नाव आणि एक चिन्ह लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आम्हाला जनतेच्या दरबारात जाता येईल, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *