ठाकरेंनी सुचवलेली चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत; स्टेपलर , पेन ड्राईव्ह सह १९७ पर्याय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० ऑक्टोबर । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करत ‘धनुष्य बाण’ हे पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय आयोगाकडे सादर केले. मात्र हे तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचं समोर आलं आहे. फ्रीज, सफरचंद, पेन ड्राईव्ह, कचरा कुंडी यासारख्या १९७ मुक्त चिन्हांपैकी एकाची निवड ठाकरेंना करावी लागणार आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे कुठल्या पर्यायाची निवड करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले आहेत. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला आहे. तर नव्या पक्ष नावासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ व ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही नावे नोंदणीसाठी दिली आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज, सोमवारी निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह व पक्षनावाबाबत पर्याय देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आयोगाने जी मुक्त निवडणूक चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये ठाकरेंनी दिलेल्या पर्यायांपैकी एकाचाही समावेश नाही. या यादीतील तीन चिन्ह प्राधान्य क्रमानुसार ठाकरेंना सादर करावी लागतील. तर आयोगाकडून त्यापैकी कुठलेही एक चिन्ह नेमून दिले जाईल.

निवडणूक आयोगाच्या यादीतील मुक्त चिन्हं कोणती?

१९७ मुक्त निवडणूक चिन्हांपैकी काही

फ्रीज
फलंदाज
सफरचंद
पेन ड्राईव्ह
रोड रोलर
रोबो
स्टेपलर
झोपाळा
पाना
कचरा कुंडी

दुसरीकडे, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाची भूमिका ठरवण्यासाठी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला शिंदे गटातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाचा हा निकाल अंधेरी पोटनिवडणुकीकरीता असल्याने त्यानंतर ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आपल्यालाच मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *