महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । Weather Updates : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेलाय. दरम्यान, हवामान विभागाने (Weather) राज्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
राज्यात सतत दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी काहीशी विश्रांती घेतली होती. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह दुपारनंतर मात्र तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, आज मुंबई, पुण्यासह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, गुरूवारी मुंबईसह पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बुलडाणा, अकोला, गोंदिया, वाशीम, अमरावती, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ या जिल्हांना यलो अलर्ट देण्यात आलाय. (Maharashtra News)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारत तसेच वायव्य भारताच्या काही भागांमधून चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून माघार घेईल. महाराष्ट्रातील सध्याची गडगडाटासह पडणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्याही काही भागांमधून मान्सून माघार घेऊ शकतो अशी शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातून परतीच्या पावसाच्या तारखा अजूनही जाहीर केलेल्या नसल्या तरी मध्य भारतातून परतीचा प्रवास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये होणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे या कालावधीत महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवासाला सुरुवात होईल असे अनुमान आहे.