मातोश्रींच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा, ऋतुजा लटके यांचे सुपुत्र अमेय लटके यांची मोजक्या शब्दात नेमकी प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ ऑक्टोबर । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश हायकोर्टाने पालिकेला दिला आहे. ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाल्यानंतर ऋतुजा लटके यांचे सुपुत्र अमेय लटके यांनी आनंद व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला आहे. उद्धव साहेब, परब साहेब किंवा शिवसेनेकडून जो पाठिंबा मिळत आलाय, तो निवडणूक संपेपर्यंत असाच राहू दे, तुमचे आशीर्वाद राहूदेत, न्यायाची जी लढाई आम्ही लढतोय, त्यात यश मिळू दे, अशी आशा ऋतुजा रमेश लटके यांचे सुपुत्र अमेय लटके यांनी व्यक्त केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिकेने तातडीने राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ऋतुजा लटके यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. लटके यांच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढत उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचं पत्र लटके यांना देण्याचे निर्देश पालिकेला दिले आहेत.

पालिकेतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा न स्वीकारण्यामागील कारणं सांगितली होती. ‘माझा राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असं म्हणण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणाऱ्याचा असतो. अशा प्रकरणांत कोर्टालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो. नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे,’ असा युक्तिवाद पालिकेचे वकील साखरे यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी अंतरिम आदेश देताना मुंबई हायकोर्टाने अत्यंत कडक शब्दांत पालिकेला फटकारलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *