अंधेरी पोटनिवडणूक : लटके आणि पटेल यांना विजय संपादन करायचा असल्यास एकगठ्ठा मराठी मते आपल्याकडे वळवावी लागणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ ऑक्टोबर । मुंबईतील अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.अंधेरी पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ८ प्रभाग आहेत. यातील ५ प्रभागांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक असून दोन भाजपचे व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.

या मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५८ हजार उत्तर भारतीय, ३८ हजार मुस्लिम, ३३ हजार गुजराती, १९ हजार दाक्षिणात्य आणि १४ हजार ख्रिश्चन मतदार असून काही मतदारांची संख्याही आहे. ऋतुजा लटके यांना विजय संपादन करायचा असल्यास त्यांना एकगठ्ठा मराठी मते आपल्याकडे वळवावी लागतील. तर उत्तर भारतीय, गुजराती यासह मराठी मते आपल्याकडे वळवण्यासाठी पटेल यांनाही कसरत करावी लागणार आहे.

मुस्लिमांची मते निर्णायक : अंधेरी पोटनिवडणुकीत मुस्लिमांची जवळपास ३३ हजारांच्या आसपास मते आहेत. ही मतेही या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. तसेच दाक्षिणात्य आणि ख्रिश्चन मतेही महत्त्वाची आहेत. लटके आणि पटेल यांच्याशिवाय या मतदारसंघात चार इतर उमेदवार असून ते किती मते घेतात यावर बरेच काही अवलंबून आहे. मुरजी पटेल यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते हजर होते. ठाकरे शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते.

सेनेचा एक तर पटेल यांचे दोन अर्ज : ठाकरे गटाकडून लटके यांच्या जवळचे संदीप नाईक यांचा पर्यायी निवडणूक अर्ज भरला आहे. तर भाजपनेही मुरजी पटेल यांचे दोन अर्ज दाखल केल्याचे या वेळी सांगण्यात आले. अंधेरी निवडणूक कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता.

सहा उमेदवार रिंगणात, दोन जण अपक्ष : २०१९ मध्ये मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून येथून ४५ हजार मते घेतली होती. तर काँग्रेसच्या अमीन कट्टी यांनी २७ हजार मते घेतली होती. सेनेच्या रमेश लटके यांचा १५ हजार मतांनी विजय झाला होता.त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार

संभाजी ब्रिगेडचा ठाकरेंना पाठिंबा : संभाजी ब्रिगेडने अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला आहे. तसे पत्र संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे यांनी पाठवले.

पंचवीस हजार मतांनी आमचाच विजय होईल
आमच्यासमोर १० तोंडांचा रावण उभा असून अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप-बाळासाहेबांची शिवसेना-रिपाइं गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा २५ हजार मताधिक्याने विजय होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. – आशिष शेलार, भाजप अध्यक्ष, मुंबई

एखाद्या महिलेला एवढा त्रास देणे कितपत योग्य
ज्याप्रकारे ही निवडणूक होत आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात राग आणि दु:ख आहे. एखाद्या महिलेला एवढा त्रास देणे किती योग्य आहे! महापालिका आणि खोके सरकार ऋतुजा लटके निवडणूक कशा लढणार नाहीत यासाठीच प्रयत्न करत होते. पण कोर्टाने त्यांना दणका दिला आहे. – आदित्य ठाकरे, युवा सेनाप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *