महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २ फेब्रुवारी २०२६ | अमेरिकेने आधी दरवाज्यावर ‘व्हिसा’ची कुलूपं ठोकली आणि आता सौदी अरेबियाने थेट ‘नोकरी’चं दारच आतून बंद केलं! परदेशात काम करण्याचं भारतीय स्वप्न अजून सुकायच्या आतच वाळवंटाच्या वाऱ्यात उडून जातंय, अशीच काहीशी अवस्था आहे. ‘व्हिजन 2030’ या गोड नावाच्या सौदी योजनेतून आलेले नवे नियम ऐकायला सुधारणा वाटतात, पण भारतीयांसाठी ते धक्का देणारेच आहेत. महाव्यवस्थापक, विक्री प्रतिनिधी, विपणन तज्ज्ञ आणि खरेदी व्यवस्थापक—ही चार पदं म्हणजे कालपर्यंत भारतीयांच्या मेहनतीची शिडी होती, आज तीच शिडी ओढून घेतली गेलीय. “आम्ही सौदीकरण करतोय” असं सांगत सौदी सरकारने स्पष्ट केलंय—या खुर्च्यांवर आता फक्त सौदी नागरिकच बसणार! म्हणजे परदेशी माणसाने फक्त काम करायचं, पण निर्णय नाही घ्यायचा; जबाबदारी घ्यायची, पण अधिकार नाही!
या निर्णयातली गंमत म्हणजे ‘पर्याय’. महाव्यवस्थापक असाल तर तुम्हाला सांगितलं जातं—“सीईओ व्हा, अध्यक्ष व्हा!” ऐकायला भारी, पण प्रत्यक्षात ती केवळ नावांची अदलाबदल. विक्री आणि विपणन क्षेत्रात तर सौदी कर्मचाऱ्यांची सक्तीची टक्केवारी, किमान वेतनाची अट आणि स्थानिकीकरणाचा कोटा—या सगळ्या कागदी अटींच्या जंजाळात परदेशी कामगार अडकणार. कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे, म्हणजे घाईघाईत बदल करा, नाहीतर दंड भरा! सौदी सरकार म्हणतं—“आम्हाला गुणवत्तेची कामगारशक्ती हवी.” पण प्रश्न असा आहे, कालपर्यंत जी गुणवत्ता सौदी अर्थव्यवस्थेचा कणा होती, ती आज अचानक अपात्र कशी ठरली? भारतीय अभियंते, व्यवस्थापक, विक्रीतज्ज्ञ यांनी उभं केलेलं हे यशाचं मनोरे आज सौदीकरणाच्या फलकाखाली झाकले जातायत.
या सगळ्याचा थेट परिणाम स्थलांतरितांवर होणारच. नवे वर्क व्हिसा बंद, पदनाम बदलायला मनाई आणि वर शैक्षणिक पात्रतेची पूर्व-पडताळणी—म्हणजे नोकरी मिळण्याआधीच परीक्षा! सौदी सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट आहे—परकीय अवलंबित्व कमी करायचं आणि तरुण सौदींना सत्ताकेंद्रात आणायचं. हे धोरण त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही, पण भारतीयांसाठी ते सावधतेचा इशारा आहे. परदेशात संधी कायम राहतील, पण त्या आता श्रमप्रधान आणि तांत्रिक भूमिकांपुरत्याच. व्यवस्थापन, निर्णय आणि धोरण—या खुर्च्या हळूहळू रिकाम्या होत आहेत. म्हणजेच, आज सौदीत नोकरी करणाऱ्या भारतीयाने एकच प्रश्न स्वतःला विचारायला हवा—आपण फक्त कामगार आहोत की उद्याचे निर्णयकर्ते? कारण उत्तर स्पष्ट आहे: वाळवंटातल्या या नव्या नियमांत स्वप्नांना आता सावली कमी आणि ऊन जास्त आहे!
