महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । Rain Updates: परतीच्या पावसाचा जोर गेल्या आठवड्यापासून वाढताना दिसत असून दोन दिवासांपासून राज्यातील अनेक शहरांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे. तर अनेक शहरे जलमय झाले. पुण्यातील मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला तर अनेक भागांत वाहतूककोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मराठवाड्यासहित विदर्भातील अनेक जिल्हांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.
सलग दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे शहरातील अनेकांचे हाल झाले. तर अनेक वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तर पुराचे पाणी घरात शिरून अनेकांचे नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर पडलेल्या पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापसाचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन पीक पाण्याखाली गेले असून कापसाच्या गाठी झाल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या आस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतलाय.