महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ ऑक्टोबर । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या विधानाने आंबेडकरी अनुयायांमध्ये रोष पसरला आहे. याप्रकरणी आठवले यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याने त्यातून उलटसुलट चर्चा होत असल्याने मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
नागपूर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आठवले यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला होता. त्या वेळी त्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. यावर त्यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.
‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याने समाजात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो; मात्र मी असे चुकीचे कधीही बोलू शकत नाही. मी स्वतः बौद्ध आहे. अनेक धम्म परिषदा मी स्वतः घेतलेल्या आहेत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महालक्ष्मी रेसकोर्स मुंबई येथे धम्म दीक्षा सोहळा आयोजित करण्याची इच्छा होती; मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. धम्मदीक्षा सुवर्णमहोत्सव २००६ मध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथे साजरा करून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते स्वप्न पूर्ण केले,’ असे सांगत ‘आपण वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिपचे जागतिक उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे मी काही चुकीचे म्हणण्याचा प्रश्नच नाही,’ असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.