महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । सन 2022 च्या दिवाळी हंगामासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवार (दि.21) पासून परिवर्तनशील अर्थात हंगामी भाडेवाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असून, ऐन सणासुदीच्या काळात एसटीचा प्रवास महागल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. या भाडेवाढीमुळे प्रवाशांना जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी साधारणतः 10 रुपये, तर आंतरजिल्हा प्रवासासाठी 40 ते 50 रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
दिवाळी सुट्यांमध्ये वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन ही संधी साधण्यासाठी एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळी सुट्यांमध्ये हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमात खासगी वाहतूकदारही अवाच्या सव्वा भाडेवाढ करून वाहतूक करतात. मात्र, तेवढे दर न वाढवता साध्या व निमआराम बसेसच्या तिकीटदरात 10 टक्के आणि शिवशाही दरांमध्ये सुमारे 12 टक्के एवढी दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ केवळ दिवाळीच्या सुटीपुरतीच लागू असेल. त्यामुळे प्रवाशांना एसटीने प्रवास करताना खिसा काहीसा हलका करावा लागणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या काळात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, प्रवाशांनी आगाऊ आरक्षणाला प्राधान्य दिले आहे. दिवाळी हंगामात परिवर्तनशील भाडे आकारणीसंदर्भात एसटी महामंडळाने परिपत्रक जारी केले आहे. त्यात तालुकांतर्गत तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी यापूर्वीचे भाडे व हंगामातील भाड्याचा तपशील नमूद केलेला आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर दिवाळीच्या काळातील गाड्यांच्या आरक्षणासाठी हे नवे दर लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.